मागील पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघूया.
मराठी भाषेप्रमाणेच जर्मन भाषेमध्येही समवयस्कांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळी संबोधने प्रचलित आहेत. जसे आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणींना किंवा भावंडाना जर्मन भाषेत ‘हालो’ (Hallo) तर प्रौढांना म्हणजेच आपले आई वडील, आजी आजोबा, अन्य नातेवाईक, अधिकारी, तिऱ्हाईत लोक, शिक्षक यांना ‘हालो’ ऐवजी आदरपूर्वक ‘गुटन मॉर्गन ‘ किंवा गुटन टाग ‘ (Guten Morgen or Guten Tag) असे संबोधून अभिवादन केले जाते.
तसेच धन्यवाद आणि सॉरी म्हणण्याच्या पध्दतीमध्येही असाच फरक आहे. लहानांना ‘डांक’ (Danke) तर प्रौढांना ‘व्हीलेन डांक’ (Vielen Dank) असे म्हणून धन्यवाद दिले जातात तर समवयस्कांना किंवा लहानांना ‘एस टूट मीअर लाइड’ (Es tut mir Leid) आणि प्रौढांना ‘एंटशुल्डिगुंग’ (Entschuldigung) तसेच ‘एस टूट मीअर लाइड’ असे म्हणून खेद व्यक्त केला जातो.
‘कसा आहेस? आणि आपण कसे आहात?’ या दोन्ही औपचारिक आणि अनौपचारिक संबोधनांमध्ये जो फरक आहे तसाच फरक जर्मन भाषेमधल्या चौकश्यांमध्ये आहे. लहानांच्या आणि समवयस्कांच्या चौकशीसाठी अनौपचारिकपणे ‘वि गेट्स’ (Wie geht’s) तर प्रौढांना ‘ वि गेट एस इहनेन’ (Wie geht es Ihnen) असे विचारून औपचारिकता दाखवली जाते.
अशा तर्हेने संभाषणातून विविध व्यक्तींना वयपरत्वे आदर दाखवण्याची जर्मन भाषेतील हि पद्धत मराठी भाषेशी नक्कीच साधर्म्य दाखवते.

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)
