जर्मन भाषेतील संख्यांची नावं आपण या पोस्ट मध्ये बघूया. अंक किंवा क्रमांकाला जर्मन भाषेत ‘झाहलेन’ (Zahlen) असे म्हणतात. मराठी मध्ये एक, दोन, आणि तीन किंवा इंग्लिश मध्ये वन , टू आणि थ्री याप्रमाणे जर्मन भाषेत संख्यांना वेगवेगळी नावे आहेत.
एक साठी ‘आईन्स’ , दोन साठी ‘झ्वाय’ तर तीनला ‘द्राय’ असे म्हणतात. चारला ‘फिअर’, पाच साठी ‘फ्यून्फ’ तर सहा साठी ‘झेख्स’ शब्दयोजना आहे. सात ला ‘झिबन’, आठ साठी ‘आख्ट’, नऊ ला ‘नॉईन’ तर दहा ला ‘त्झीन ‘ असे म्हणतात
११ ते २० या क्रमांकांची वेगवेगळी नावं हि अशी –
११ ला ‘एल्फ’, १२ ला ‘झ्व्योल्फ’, १३ साठी ‘द्रायत्झीन’, १४ ला ‘फिअरत्झीन’, १५ ला ‘फ्युन्फत्झीन’, १६ साठी ‘झेशत्झीन’, १७ ला ‘झीब्त्झीन’, १८ साठी ‘आख्टत्झीन’, १९ ला ‘नॉईनत्झीन’ आणि २० ला ‘झ्वान्झिश’ अशी शब्दयोजना आहे. पुढील क्रमांक म्हणजेच ३० ला ‘द्रायझिश’, ४० ला ‘फिअरझिश’, ५० ला ‘फ्युन्फझिश’, ६० ‘झेशझिश’, ७० ला ‘झिबझिश’, ८० ला ‘आख्टझिश’, ९० ला ‘नॉईनझिश’ आणि १०० ला ‘हुंडर्ट’ म्हणतात.
‘आईन् उंड (आणि) झ्वान्झिश’ (एकवीस) म्हणजे २१ तर ‘झ्वाय उंड झ्वान्झिश’ (बावीस) म्हणजेच २२. अशा तर्हेने १ ते १० मधील ‘झ्वान्झिश’ बरोबर जोडून २१ ते ३० मधील क्रमांक तसेच ३१ ते ४०, ४१ ते ५० आणि पुढचे क्रमांक बनवता येतील.
मराठीतील आणि जर्मन मधील २१ पुढील क्रमांकांच्या रचनेमध्ये बरेच साधर्म्य आहे. जसे जर्मन मधील आईन उंड झ्वान्झिश म्हणजेच- एक आणि वीस व मराठी मधील- एकवीस या रचनांमध्ये नक्कीच साम्य आहे. तसेच ३१ जे कि आईन उंड द्रायझिश म्हणजेच एक आणि तीस, तेच मराठीत ३१ म्हणजेच एकतीस. हेच साम्य पुढील बऱ्याच संख्या-रचनांमध्ये मध्ये दिसते.
अशा तर्हेने , या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील क्रमांकांच्या रचनेबद्दल जाणून घेतल्यावर आता पुढच्या पोस्ट मध्ये क्रमिक संख्यांबद्दल म्हणजेच ‘ऑर्डिनल्स’ बद्दल माहिती घेऊया.

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply