या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत.
जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’ संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’ आणि भावाला ‘ब्रुडर’; मुलाला ‘जॉन्न’ तसेच ‘युंग’(युंग-अ) तर मुलीला ‘टॉख्टर’ तसेच ‘मेडशेन’ म्हणतात. आजीला ‘ग्रोसमुट्टर’ किंवा ‘ओमा’ तर आजोबांना ‘ग्रोसफाटर’ किंवा ‘ओपा’ असे म्हणतात. ‘पालक’ म्हणजेच जर्मन भाषेमध्ये ‘एल्टर्न’ तर आजी आजोबा म्हणजेच ‘ग्रोसएल्टर्न’! बाळाला ‘बेबी’ तर लहान मुलाला किंवा मुलीला ‘किण्ड’ म्हणतात. ‘किण्ड’ चे अनेकवचन ‘किण्डर’ म्हणजेच अनेक मूलं.
जर्मन मध्ये नातेवाईकांना ‘फेरवाण्डट’(-अ) संबोधले जाते. मात्र मावशी, काकू, आत्या यांना इंग्लिश मधील ‘आण्टी’ प्रमाणे एकच शब्द ‘टाण्ट’ (टाण्ट-अ) बोलला जातो. तसेच काका आणि मामा यांनाही ‘ओंकेल’ असे संबोधले जाते. सासू साठी ‘श्विगरमुट्टर’ तर सासरे यांसाठी ‘श्विगरफाटर’ अशी शब्दयोजना आहे. ‘श्वेगरिन’ म्हणजेच नणंद तर ‘श्वागर’ म्हणजेच दीर. भाचा आणि पुतण्या या दोघांनाही ‘नेफ्फ’ तर पुतणी आणि भाची यांना ‘निश्ट’ म्हणतात.आपल्या घरातील सदस्यांप्रेमाणेच असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना विसरून कसे चालेल? मित्र म्हणजेच ‘फ्रॉईन्ड’ तर मैत्रिणीला म्हणतात ‘फ्रॉइंडीन’.
या सर्व शब्दांमधील स्त्रीवाचक शब्द म्हणजेच मुट्टर, ग्रोसमूट्टर , श्वेस्टर यांच्या अगोदर ‘दी’; तर पुरुषवाचक शब्दांच्या अगोदर ‘देअर’ लावून या शब्दांचा उच्चार केला जातो. जसे ‘दी मुट्टर’ किंवा ‘देअर फाटर’. मात्र मेडशेन ,बेबी आणि किण्ड या नावांच्या आधी ‘दास’ लावतात जसे
‘दास मेडशेन’, ‘दास बेबी’ आणि ‘दास किण्ड’.
वरील माहिती वाचून जर्मन मध्ये मला सांगाल का,की तुमच्या परिवारात कोण कोण आहे?

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply