या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया.
आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत.
आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय आहेत ते बघूया. जर्मन भाषेमध्ये प्रोफेशनला म्हणतात ‘बेरूफ’. व्यवसायाला म्हणतात ‘उंटरनेहमेन’ तर जॉबला ‘जॉब’च म्हणतात किंवा ‘अर्बाईट’ असेही म्हणतात.
जर्मनीमध्ये पुरुष व्यावसायिक आणि स्त्री व्यावसायिक यांना वेगवेगळ्या प्रकारे संबोधित केले जाते, जसे की पुरुष डॉक्टरला ‘आर्झ्ट’; तर महिला डॉक्टरला ‘आर्झ्टीन’ संबोधले जाते. नर्स म्हणजे ‘क्रांकेनश्वेस्टर ‘. पुरुष इंजिनीयरला ‘इंजीनीयोर’ तर महिला इंजिनियरला ‘इंजीनीयोरीन’ म्हणतात. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ‘मशिनेनबाऊइंजीनीयोर’, कॉम्प्युटर इंजिनियर ‘कॉम्प्युटर-टेशनीकर’, आणि सिविल इंजिनियरला ‘बाऊइंजीनीयोर’ म्हणतात. आयटी प्रोफेशनल ‘आयटी प्रोफी’ म्हणून ओळखला जातो. आर्किटेक्ट म्हणजे ‘आर्शिटेक्ट/आर्शिटेक्टीन’. कलाकार म्हणजे ‘क्यून्स्टलर/क्यून्स्टलरिन’. (महिलावाचक नावांच्या शेवटी ‘टीन’ आणि ‘रिन’ वापरतात. मात्र काही प्रोफेशन्स मध्ये नावांच्या शेवटी रिन किंवा टीन लावले जात नाही)
वकिलाला म्हणतात ‘आनवाल्ट/आनवेल्टीन’, तर बँकरला ‘बांकर/बांकरीन’. डेंटिस्ट म्हणजे ‘झानार्झ्ट/झानएर्झ्टीन’; तर शिक्षक म्हणजे ‘लेहरर/लेहररीन’. मॅनेजरला जर्मन मध्येही ‘मॅनेजर/मॅनॅजरिन’ असेच म्हणतात. मार्केटिंग प्रोफेशनल म्हणजेच ‘मार्केटिंगप्रोफी’, तर लँग्वेज प्रोफेशनल म्हणजेच ‘श्प्राखप्रोफी’. पोलिसांना म्हणतात ‘पोलीझाय/ पोलिझीस्टीन’. सर्व प्रकारचे सरकारी, खाजगी आस्थापनांमधील ऑफिसर्स हे ‘बेआम्टेन’ या नावाने ओळखले जातात.
आपला अन्नदाता शेतकरी त्याला विसरून कसं चालेल? शेतकरीला म्हणतात ‘बाऊअर/ बॉयरीन’. फार्मासिस्ट म्हणजे ‘आपोथेकर/आपोथेकरीन’. बायकांच्या जिव्हाळ्याची ब्युटीशियन ही ‘कॉस्मेटिकरीन’. लायब्ररी सांभाळणारा ‘बिब्लिओथेकर/बिब्लिओथेकरीन’. सर्व प्रकारचे उद्योजक, विविध दुकानदार हे अनुक्रमे ‘उंटरनेहमर’ आणि ‘शॉपबेट्रायबर’ होय.
आचारी अर्थातच शेफ म्हणजे ‘कॉख/क्योशीन’ . बेकरला ‘बेकर/ बेकरीन’ संबोधतात. कार्पेंटर म्हणजे ‘झिमरमान’, चांभाराला ‘शूस्टर’, गवंडीला ‘मावरर’ संबोधले जाते.
या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्यांच्याशी आपला विविध कामांनिमित्त संबंध येतो त्या व्यक्ती म्हणजे पोस्टमन,लॉन्ड्रीवाला, वृत्तपत्र विक्रेते, डिलिव्हरी बॉय, भाज्या आणि फळ विक्रेते, विविध कामगार,आपले घर झाडून पुसून स्वच्छ ठेवणाऱ्या बाई; या सर्वांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘ब्रीफट्रेगर’, ‘वेशर’, झायटुंग्ज-फेरकॉयफर’, ‘लीफरुंगेन’, ‘ऑब्स्ट उंड गेम्यूज फेरकॉयफर’,’अर्बाईटर’, ‘पुट्झफ्राऊ’ असे म्हणतात.
ही सर्व माहिती वाचल्यावर मला तुम्ही जर्मन मध्ये सांगाल, तुमचे प्रोफेशन काय?

© 2023 Fungerman.in (by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply