या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेचा पाया ‘देअर, दी ,दास’ म्हणजेच आर्टिकल्स बघणार आहोत. असे ही म्हणायला हरकत नाही की ‘आर्टिकल्स’ हा संपूर्ण जर्मन भाषेचा आधारस्तंभ आहे!
मराठीमध्ये असे कोणतेही आर्टिकल्स प्रचलित नाहीत पण मराठीतील स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नंपुसकलिंग यांच्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये लिंगाधारित नावं अर्थात ‘नाम’ प्रचलित आहेत. या लिंगांनाच ‘देअर’ (Der), ‘दी ‘ (Die) आणि ‘दास’ (Das) असे संबोधले जाते. ‘देअर’ म्हणजे पुल्लिंगी शब्द , ‘दी’ म्हणजे स्त्रील्लिंगी तर ‘दास’ म्हणजे नपुंसकलिंगी शब्द. जर्मन भाषेमध्ये नावांच्या म्हणजेच इंग्लिशमधील नाऊन्सच्या अगोदर त्यांची संबंधित लिंग म्हणजेच देअर, दी किंवा दास यांचा उच्चार करावा लागतो . जसे ‘देअर बाल’ -der Ball (जर्मन मध्ये ‘बाल’ ( इंग्लिशमधील बॉल ) हा शब्द पुल्लिंगी समजला जातो. ) तर ‘दी टोमाट’– die Tomate (टोमाट-अ ( टोमॅटो ) हा शब्द जर्मन मध्ये स्त्रीलिंगी आहे.) ‘दास हॉटेल’– das Hotel ( ‘हॉटेल’ हा जर्मनमध्येही जशास तसा उच्चारला जाणारा शब्द नपुंसकलिंगी आहे)
इंग्लिश मध्ये मात्र A, An , The हे आर्टिकल्स प्रचलित आहेत पण स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग हे लिंगप्रयोग इंग्लिश मध्ये नाहीत.
देअर ,दी आणि दास प्रमाणे एकवचनी शब्दांना अनुक्रमे ‘आईन -Ein’ (पुल्लिंग), ‘आईनं-Eine’ (स्त्रीलिंग) आणि ‘आईन-Ein’ (नपुंसकलिंग) असे म्हणतात . यामध्ये दोन्ही पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी ‘आईन’ हे सारखेच असले तरी व्याकरणातील आणि वाक्यातील वेगवेगळ्या संदर्भांमुळे दोन्ही (पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी) ‘आईन’ च्या गटातील संबंधित शब्द ओळखता येतात.
असे असंख्य शब्द देअर (Der) ,दी (Die) आणि दास (Das) या आर्टिकल्स मध्ये विभागले गेले आहेत. या आर्टिकल्सच्या नियमित आणि भरपूर सरावाने जर्मन भाषेचे शिक्षण सहजसोपे होते.

© 2023 Fungerman.in ( by Sayali Marathe)
Image Credit- Freepik.com
(https://www.howtopronounce.com- pronunciation dictionary of German words)

Leave a Reply